कोरोनामुळे आधीच जगणं मुश्किल झालं होतं. मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन पोरं. त्यांनी शिकून मोठं व्हावं अशी आमची इच्छा होती.
आम्ही जे भोगलं ते त्यांनी भोगू नये असंच आम्हाला वाटायचं.म्हणून आम्ही पोरांना कधी शेतीची कामं करायला नाही लावली.
त्यांनी शिक्षण घ्यावं इतकंच वाटायचं.पण आमच्या नशिबात नव्हंतच ते.पुरात माझा मुलगा वाहून गेला.दोन दिवसांनी त्याचा मृतदेहच समोर दिसला.
त्याला तसं बघून काळजाच्या चिंधड्या झाल्या. आमचं धन गेलं.आता आम्हाला फक्त एक मुलगी होती.जगण्याचा आधार गेला.खूपच हताश होतो आम्ही.जगण्याची इच्छाच उरली नव्हती.
तहानभूक हरवून आम्ही फक्त का जगायचं इतकाच विचार करत होतो.पण ग्रामपंचायतीने आमची माहिती सांगली जिल्हा प्रशासनाला दिली.आणि त्यांच्यातर्फे काम करणाऱ्या शुश्रुषा संस्थेच्या मानसतज्ञांची टीम घरी आली.
त्यांनी आमचं समुपदेशन केलं.मार्गदर्शन केलं.त्यांनी आमचं मनोबल वाढवलं.विचारांना वेगळी दिशा दिली.आयुष्यातला हा सर्वात वाईट प्रसंग स्विकारून आता आम्हाला पुढचं आयुष्य जगायचं होतं.
मुलगा गमवावा लागला तरी मुलगीच्या रुपात संपत्ती बाकी होती.तिला आता शिकवून खूप मोठी करायचं ठरवलं.आमची सगळी स्वप्न ती पूर्ण करेल ह्याची आम्हाला खात्री पटली.
मी शुश्रुषा संस्थेचे आभार मानते की त्यांनी आम्हाला नव्याने जगण्याची उमेद दिली.मी आमच्यासारख्या आपल्या माणसांना गमवलेल्या लोकांना सांगेन की तुम्हीही या संस्थेची मदत घ्या.तुम्हाला सुद्धा कटू वास्तव पचवण्याचं बळ मिळून आयुष्याला नवी पालवी फुटेल.
– रुक्मिणी शिंदे